#DhomeBalakvadi – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Mon, 16 Mar 2026 11:20:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #DhomeBalakvadi – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा…..किती आहे ते पहा…. https://swabhimansatara.com/2026/satara-district-for-summer-water-124-tmc-available/ https://swabhimansatara.com/2026/satara-district-for-summer-water-124-tmc-available/#respond Mon, 16 Mar 2026 11:20:05 +0000 https://swabhimansatara.com/?p=851

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असून, जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प मिळून सुमारे १२४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीही तातडीची चिंता नसली, तरी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या कोयना धरणात सध्या ६९.८५ टीएमसी पाणीसाठा असून धरण सुमारे ६६ टक्के भरलेले आहे. कोयना धरणावर सांगली जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र आणि राज्याच्या वीजनिर्मितीचा मोठा भाग अवलंबून असल्यामुळे हा साठा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

याशिवाय उरमोडी धरणात सुमारे ७ टीएमसी पाणी असून ते ७० टक्के भरलेले आहे. कण्हेर धरणात सध्या ६.८५ टीएमसी पाणी असून ते सुमारे ६७ टक्के भरलेले आहे. धोम धरणात ७.४० टीएमसी पाणीसाठा असून ते ५४ टक्के भरलेले आहे.
तर धोम-बलकवडी धरणात २.२७ टीएमसी पाणी असून सुमारे ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, तारळी धरणात सर्वात कमी पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. या धरणाची एकूण क्षमता ५.८५ टीएमसी असून सध्या त्यामध्ये २.३४ टीएमसी म्हणजे सुमारे ४० टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.

मध्यम प्रकल्पांमध्ये निरा-देवघर धरणात ७.५८ टीएमसी पाणी असून ते ६३ टक्के भरलेले आहे. भाटघर धरणात १५.९७ टीएमसी पाणीसाठा असून ते ६७ टक्के भरलेले आहे.तर वीर धरणात ५.२८ टीएमसी पाणी असून सुमारे ५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, आठ धरणांतून सध्या ४ हजार ९५१ क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत असून हे पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये चांगला साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला परिस्थिती तुलनेने स्थिर असली, तरी एप्रिल आणि मे महिन्यात तापमान वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.म्हणूनच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच सिंचनासाठीही पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-district-for-summer-water-124-tmc-available/feed/ 0 851