गाठीच्या ऑपरेशननंतर पाळीव श्वानाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप

सातारा : गोडोली नाका येथील जनावरांच्या दवाखान्यात गाठीचे ऑपरेशन केल्यानंतर उपचारातील हलगर्जीपणामुळे पाळीव श्वानाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तक्रारदार राकेश साळुंखे यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पाळीव प्राण्यांच्या उपचारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तक्रारदार राकेश साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या पाळीव श्वानाच्या गाठीचे ऑपरेशन गोडोली नाका येथील जनावरांच्या दवाखान्यात डॉ. चापणे यांच्याकडे करण्यात आले होते. मात्र, ऑपरेशननंतर अवघ्या तीन दिवसांत श्वानाचे टाके तुटले. त्यानंतर पुन्हा टाके घालण्यात आले, पण ते देखील दोन दिवसांत निघाल्याचा आरोप त्यांनी केला.याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर ते स्वतः न येता त्यांच्या शिकाऊ सहकाऱ्यांना पाठवत होते. संबंधित सहकारी डॉक्टरांना फोनवर परिस्थिती सांगत होते आणि त्यानुसार औषधांचे डोस दिले जात होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत योग्य डोसचे प्रमाण न समजल्यामुळे श्वानाला ओव्हरडोस झाला आणि त्याच्या किडनी निकामी झाल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.त्यानंतर श्वानाच्या डाव्या पायाला सूज येणे, काळ्या रंगाच्या उलट्या होणे असे गंभीर प्रकार सुरू झाले. याबाबत डॉक्टरांना सांगितले असता “जखमेवरील आयोडीन चाटले असेल” असे कारण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यामुळे श्वानाची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.“मुका प्राणी असला तरी तोही घरातील सदस्यच असतो. आमच्या घरातील एका निरपराध जीवाचा हलगर्जीपणामुळे बळी गेला. भविष्यात इतर कुणाच्या पाळीव प्राण्याबाबत अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही हा अनुभव समोर आणत आहोत,” अशी भावना तक्रारदार राकेश साळुंखे यांनी व्यक्त केली.दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *