अमर मोकाशी यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

सातारा तालुक्यातील बसाप्पाची वाडी या छोट्याशा खेडेगावातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमर मोकाशी यांनी जिल्ह्याच्या पत्रकारितेत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवला आहे. एक ग्रामीण वार्ताहर ते संपादक असा त्यांचा खडतर, जिद्दी आणि यशस्वी प्रवास आदर्शवत आहे. सातारा येथील विविध दैनिकांमध्ये वार्ताहर, शहर प्रतिनिधी, मुख्य वार्ताहर, उपसंपादक म्हणून काम करताना त्यांनी क्राईम, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा सर्वच बीटवर एक अभ्यासू, सक्षम, निर्भीड आणि धडाडीचे पत्रकार म्हणून काम करताना आपल्या लेखणीतून त्यांनी विविध विषयांना आणि समाजातील अन्यायाला वाचा फोडून सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेत अल्पावधीत नाव कमावलेल्या अमर मोकाशी यांचा पत्रकारितेतील प्रवास वाखाणण्याजोगा तर आहेच पण, त्यांचा हा प्रवास नवोदित पत्रकारांसाठी आदर्शवत आहे. सोशल मीडियाच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘लाईव्ह सातारा’चे संपादक म्हणून उल्लेखनीय काम करून आजच्या सोशल मीडियाला दिशा देण्याचे काम केले आहे.

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘विश्वकर्मा आदर्श पत्रकार’ पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना जाहीर झाला आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला कायम न्याय देण्याची भूमिका ठेवणारे अमर मोकाशी हे गेल्या १२ वर्षांपासून सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यालयीन कामकाजाबरोबरच ते जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले अमर मोकाशी हे एक उत्कृष्ट वक्ते, गायक, अभिनेते सुद्धा आहेत. छंद आणि आवड म्हणून ते विविध मराठी मालिका, चित्रपट, वेब सिरीजमध्येही झळकले आहेत. याशिवाय ते एक उत्तम बॉक्सिंग खेळाडू आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते बॉक्सिंग खेळाचे महाराष्ट्राचे नामांकित आणि निःपक्षपाती पंच म्हणूनही ओळखले जातात. या सर्व बाबींचा विचार करून अमर मोकाशी यांची ‘राज्यस्तरीय विश्वकर्मा आदर्श पत्रकार’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, कार्याध्यक्ष गजानन घाडगे यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान, पत्रकार मोकाशी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन सातारा जिल्हा यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *