
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील यांची जाहीर सभा महाबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेत बोलताना मंत्री मकरंद पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजयी करा. तुमचा मकरंद आबा आता आमदार नसून नामदार झाला आहे.” महाबळेश्वरच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “महाबळेश्वर नगरपालिकेने जे प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील, ते शंभर टक्के मंजूर होतील. कारण राज्याच्या तिजोरीची चावी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची चिंता करू नका.”
महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन सुविधा, स्वच्छता व नागरी मूलभूत सुविधा यासाठी जे काही करता येईल ते करण्याची ग्वाही मंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी दिली.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला महाबळेश्वरमध्ये नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.