कृष्णा मॅरेथॉन २०२५ : जयवंतराव भोसले जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन रविवारी, दिनांक २१ डिसेंबर

कराडमध्ये रविवारी, दिनांक २१ डिसेंबर रोजी ‘कृष्णा मॅरेथॉन’चा उत्साहात शुभारंभ होणार आहे. सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे या भव्य आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्याकडे वाटचाल आणि समाजमनात सकारात्मकता रुजवणे, हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश असून, यंदाच्या स्पर्धेत सुमारे २००० हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. ही मॅरेथॉन रविवारी पहाटे ५.३० वाजता कृष्णा विश्व विद्यापीठ परिसरातून सुरू होणार आहे. सातारा जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विनायक भोसले यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन होणार आहे.

मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर असे दोन गट ठेवण्यात आले असून,१८ वर्षांखालील, १९ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ वर्षांवरील असे पाच वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील धावपटूंना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धकांसाठी कृष्णा विश्व विद्यापीठाने विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक सहभागीला मेडल, मॅरेथॉन किट आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे. यासोबतच फिजिओथेरपी सपोर्ट, वैद्यकीय मदत, नाश्ता, तसेच प्रत्येक दोन किलोमीटरवर हायड्रेशन पॉइंट्सची सुविधा असणार आहे. शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, मार्ग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांचे जाळे आणि वैद्यकीय यंत्रणा यांची काटेकोर तयारी करण्यात आली आहे.

आरोग्य, उत्साह आणि प्रेरणेचा संगम असलेली ‘कृष्णा मॅरेथॉन’ कराडसह संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *