
सातारा शहरात वृद्ध महिलांना सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने फसवणूक करून लुटणाऱ्या सराईत भामट्याला सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले असून तब्बल ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
सातारा शहर परिसरात वृद्ध महिलांना लक्ष्य करून हा आरोपी स्वतःची ओळख साधी व्यक्ती म्हणून करून देत असे. सोन्याची बिस्किटे देण्याच्या बहाण्याने महिलांचे लक्ष विचलित करून त्यांच्या अंगावरील दागिने फसवणूक करून काढून घेण्याचे प्रकार सुरू होते.
या प्रकारामुळे सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कदम, उपविभागीय अधिकारी राजीव नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या यशस्वी कारवाईमुळे सातारा शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.