
ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र नाताळ सण गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरात नाताळचा जल्लोष सुरू झाला आहे. नाताळ सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून विविध प्रकारचे केक, चॉकलेट्स, भेटवस्तू, सांताक्लॉजचे कपडे, फरचे टेडी, लाल टोप्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
दुकानांबाहेर उभ्या करण्यात आलेल्या सांताक्लॉजच्या आकर्षक प्रतिकृती चिमुकल्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बाजारपेठेत फेरफटका मारताना नाताळ सणाचा माहोल ठळकपणे जाणवत आहे.
काही चर्च परिसरात येशू ख्रिस्तांच्या जन्मसोहळ्याचे देखावे उभारण्यात येत असून नाताळनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम,निबंध स्पर्धा, काव्यगायन स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे.बहुतांश ख्रिस्ती बांधवांकडून नाताळनिमित्त ख्रिसमस ट्रीची उभारणी केली जात असून मोठा, उंच आणि सुंदर ख्रिसमस ट्री उभारण्यासाठी धावपळ सुरू आहे.