
सातारा : समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याच्या उद्देशाने सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने वळसे (ता. सातारा) येथील एहसास मतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.या उपक्रमात पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे, त्यांचा परिवार तसेच तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार सहभागी झाले होते. या प्रसंगी संस्थेतील विशेष मुलांना फराळाचे तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान श्री. तांबे यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. “सणांचा खरा आनंद तो समाजातील सर्व घटकांशी वाटण्यात आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या उपक्रमामुळे संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, पोलिस विभागाच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.