सातारा जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे वाठार स्टेशन येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान वाठार स्टेशन परिसरासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सायन्स कॉलेज सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.यावेळी प्राचार्या सौ जमदाडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल जाधव व प्राचार्य किरण भोईटे सर यांच्या सायन्स कॉलेजच्या मागणीला हिरवा कंदील देत ग्रामस्थांच्या व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा विभाग प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.या दौऱ्याच्या वेळी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापनाच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीची दखल घेत कौस्तुभ गावडे यांनी वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्यास संस्थेच्या वतीने मान्यता दिली. पुढील शैक्षणिक वर्षातच विज्ञान शाखा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या निर्णयामुळे वाठार स्टेशन व पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, विज्ञान शाखेसाठी दूर जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.गावडे यांनी ग्रामस्थांसोबत सायन्स कॉलेजबाबत सकारात्मक चर्चा केली. ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली असून, अनेक वर्षांपासून रखडलेला महत्त्वाचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.