
वाईमध्ये धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक अडचण असल्याचे सांगून 12 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने, कार आणि 2 ते 3 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून एका श्रेणी पोलिस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप कारवाई न झाल्याने तक्रारदार कुटुंबाने वरिष्ठांकडे धाव घेतली आहे.
या प्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संपत भोसले, अजिंक्य जाधव आणि तुषार ताटे यांच्याविरोधात वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार सीमा सचिन जमदाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती सचिन जमदाडे हे जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहेत. त्याच ओळखीमुळे संपत भोसले यांचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते.
सीमा जमदाडे यांचा हॉटेल व्यवसाय असून त्या व्यवसायासाठी कारचा वापर करत होत्या. 1 मार्च 2019 रोजी संपत भोसले आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये आले आणि काही कामासाठी कार हवी असल्याचे सांगत कार नेली. काही दिवसांत परत करतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे कारण देत तक्रारदारांच्या पतीकडून 2 ते 3 लाख रुपये गुगल पे आणि रोख स्वरूपात घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.मात्र, वेळोवेळी मागणी करूनही कार, सोन्याचे दागिने आणि पैसे परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. यानंतर त्यांनी वाई न्यायालयात धाव घेत संशयितांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला.
न्यायालयाच्या आदेशानंतर 2 फेब्रुवारी 2026 रोजी वाई पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, गुन्हा दाखल होऊन तब्बल दीड महिना उलटूनही संबंधितांवर ठोस कारवाई न झाल्याचा आरोप केला जात आहे.
एकीकडे कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यावरच फसवणुकीचा आरोप झाल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.