
कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे गवा विहिरीत पडल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
धोंडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. दरा नावाच्या शिवारात सर्जेराव खरात यांच्या विहिरीत एक गवा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, गाव परिसरात आणखी काही गवे फिरत असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रात्री उशीरा वन विभागाला गव्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले असून त्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
या दरम्यान गव्याने दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सदाशिव काकडे (वय ७०) आणि वेदांत संतोष पाटील (वय १६) अशी जखमींची नावे ग्रामस्थांनी सांगितली आहेत.
घटनेनंतर गावकऱ्यांनी परिसरातील गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.