
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता सातारा जिल्ह्यात उमटू लागले आहेत.
साताऱ्यात दररोज साधारण २२ हजार घरगुती गॅस सिलिंडरची मागणी नोंदवली जात होती. मात्र सध्या ही मागणी वाढून तब्बल ३० हजार सिलिंडरपर्यंत पोहोचली आहे.
टंचाईच्या भीतीने अनेक ग्राहकांनी नेहमीपेक्षा आधीच सिलिंडर बुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गॅस एजन्सीजवर प्रचंड ताण आला असून गॅस कंपन्यांची ऑनलाईन बुकिंग सेवा अनेक वेळा ठप्प होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.
सातारा जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे ऑनलाईन बुकिंग सेवा अनेकदा ठप्प होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संभाव्य टंचाईच्या भीतीने ग्राहकांनी आधीच बुकिंग करण्यास सुरुवात केल्याने एजन्सीजवर मोठा ताण निर्माण झाला आहे. एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचेही दिसत आहे.दरम्यान देशातील अनेक शहरांमध्ये गॅस टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांनी गॅस एजन्सीजसमोर गर्दी केली.
अनेक ठिकाणी महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही सिलिंडर मिळाला नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.
तुटवड्याचा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायालाही बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने काही ठिकाणी हॉटेल व्यवसाय अडचणीत आला असून परिस्थिती अशीच राहिल्यास व्यवसाय बंद ठेवावा लागू शकतो, अशी चिंता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.