
तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एस.के.एस. केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन संपूर्ण परिसर हादरून गेला.सकाळी साडेआठच्या सुमारास पहिला जोरदार स्फोट झाला. त्यानंतर अल्पावधीतच आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज तब्बल १० किलोमीटर परिसरात ऐकू आला, ज्यामुळे ग्रामस्थांच्या कानठळ्या बसल्या.
प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर किंवा रिअॅक्टरचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट इतका भीषण होता की, रिअॅक्टरचे झाकण तब्बल १०० मीटर दूर जाऊन पडले.
या स्फोटांनंतर कंपनीत भीषण आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला तब्बल ५० ते ५५ फूट उंच उसळताना दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री कारखाना, कराड नगरपालिका आणि जयवंत शुगर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, स्फोटाचा परिणाम परिसरातील गावांवरही झाला आहे. तासवडे, वराडे, वहागाव, तळबीड आणि घोणशी या गावांसह १० किलोमीटर परिसरातील घरांना तडे गेले असून, अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
मात्र, सुदैवाची बाब म्हणजे ही घटना कंपनी बंद असताना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.