
सुरूर–पोलादपूर राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आता महाबळेश्वरमध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याच्या निषेधार्थ महिला दिन आणि रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
पहा नक्की काय घडलंय ?
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या सुरूर–पोलादपूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. डिसेंबर २०२४ पासून सुरूर ते वाई या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पसरणी घाटातील मोऱ्या आणि संरक्षक भिंतींचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराने पाचगणी–महाबळेश्वर टप्प्यातील काम सुरू केल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः पाचगणी ते महाबळेश्वर या सुमारे वीस किलोमीटरच्या मार्गाची अवस्था अतिशय खराब झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी पेटीट ग्रंथालय मैदानावर पक्षनिरपेक्ष नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महिला दिन आणि रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आंदोलनानंतरही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही, तर बेमुदत शहर बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
यासोबतच सोमवारी नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, वन विभाग, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस ठाणे येथील प्रमुख अधिकाऱ्यांना मोर्चा काढून नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
सुरूर–पोलादपूर महामार्गाच्या कामाला लवकर गती मिळते का आणि नागरिकांचा रोष शांत होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.