
कोरेगाव – मुकुंदराज काकडे : पिंपोडे खुर्द येथे विद्यार्थ्यांचा संताप, एसटी बस अडवलीकोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे आज सकाळी विद्यार्थ्यांनी एसटी बस अडवून संताप व्यक्त केला. साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन आणि देऊर या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारी होत असूनही एसटी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे आज पिंपोडे खुर्द येथील निलेश कदम व इतर विद्यार्थ्यांनी मिळून एसटी बस अडवली आणि आपल्या समस्या ठळक केल्या. काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच हा प्रश्न एसटी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, पुढील काळातही जर साताऱ्याकडे जाणाऱ्या बसेस पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन आणि देऊर येथे थांबल्या नाहीत, तर आणखी मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला असून, आता एसटी विभाग कोणती ठोस भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.