
सातारा नगरपालिकेचे राजकारण पेटले !
सातारा | सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण अक्षरशः तापलं आहे. पण अजूनही प्रमुख दोन आघाड्यांकडून उमेदवारांची घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडी या दोन्ही गटांनी पत्ते अजून उघडलेले नाहीत.
दरम्यान, महायुतीतील मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भाजपसोबत किती जागा मिळणार, कोणत्या प्रभागात देसाई गटाचे उमेदवार उतरतील, यावर सत्तारूढ समीकरणं ठरणार आहेत. देसाईंच्या गोटात तयारी सुरू असून, “महायुतीत सन्मानजनक वाटप मिळालंच पाहिजे” अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हालचालींनी चर्चेला तोंड फुटलं आहे. या चर्चेने वातावरण पेटवलं आहे. त्यांच्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. “शशिकांत शिंदे यांचा गट उतरला तर साताऱ्याचं राजकीय गणितच उलटेल” अशी कुजबुज सुरु आहे. मंत्री मकरंद पाटील मात्र पूर्ण ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. दोन्ही राजघराण्यांच्या गोटांशी संपर्क ठेवत पाटील शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. खात्रीशीर सूत्रांचं म्हणणं आहे की “मकरंद पाटील कोणत्या बाजूने झुकतात, यावरच साताऱ्याचा पुढचा ‘गेम’ ठरणार आहे. “साताऱ्याचं राजकारण सध्या अनिश्चिततेच्या वादळात सापडलं आहे. आघाड्या उमेदवार जाहीर करत नाहीत, नेते मौन बाळगतात, आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
शहरातील जनतेत एकच चर्चा. “कोण करणार घोषणा? कोण घेणार साताऱ्याच्या नगरभवनात सत्ता ?”राजकीय विश्लेषकांचं ठाम मत –“ही निवडणूक फक्त नगरपालिका नाही, तर राजघराण्यांची प्रतिष्ठा आणि साताऱ्याच्या राजकीय भवितव्याची निर्णायक लढत आहे. एकूणातच सातारा सज्ज आहे, रणशिंग वाजलं आहे, पण सेनापती अजून सावलीत आहेत!आता सर्वांची नजर – उदयनराजे, शिवेंद्रराजे, शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांच्या पुढच्या पावलावर…