“साताऱ्याच्या नगराध्यक्षपदावर ‘युवा लाट’ येणार का? २३ इच्छुकांची शर्यत, सातारकरांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू ‘नवा चेहरा”

सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीची रणधूमाळी रंगात आली असून, नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या राजकीय रंगमंचावर आता चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे — साताऱ्याला पुढचा नगराध्यक्ष कोण?या पदासाठी सत्ताधारी भाजपकडे आतापर्यंत तब्बल २३ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर गटांमधूनही अनेक नावे पुढे येत आहेत.परंतु या सर्व राजकीय गदारोळात एक ठळक भावना सातारकरांमध्ये दिसून येते — “शहराच्या विकासाला गती देणारा, नव्या विचारांचा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन असलेला युवा नगराध्यक्ष मिळावा.”या पार्श्वभूमीवर सध्या शहरात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या लोकसेवक सौ. शिवानीताई कळसकर यांचे. त्यांनी सातारा शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.याच बरोबर, संग्राम बर्गे आणि काका धुमाळ यांची नावेही भाजपच्या अंतर्गत चर्चेत अग्रस्थानी आहेत.तर बाबराजेंच्या गटातून — अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण आणि अशोक मोने हे चेहरे चर्चेत आले आहेत.मूळ भाजप संघटनातून सिद्धी पवार, धनंजय जांभळे आणि सुवर्णाताई पाटील यांनीदेखील नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी सादर केली आहे.राजकीय समीकरणे आणि गटांची गणिते अजूनही आकार घेत असतानाच, सातारकर मात्र उत्सुकतेने वाट पाहत आहेत — या सर्व उमेदवारांमधून कोण “फ्रेश, डायनॅमिक आणि शहरविकासाचा व्हिजन असलेला” नेता पुढे येणार?साताऱ्याच्या राजकीय भवितव्यास आकार देणारे हे उत्तर ३ डिसेंबर रोजी मिळणार आहे. त्या दिवशी सातारकर कोणत्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात, यावरच शहराच्या पुढील पाच वर्षांचा दिशादर्शक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *