
पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय श्री सेवागिरी खुला युवा महोत्सवाचे आयोजन शनिवार, दिनांक २० डिसेंबर रोजीसकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे सलग बारावे वर्ष असून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातील इच्छुक व होतकरू कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रास्थळी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात माहिती देताना देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य (लाईव्ह), रेकॉर्ड लोकनृत्य,पथनाट्य,सुगम गायन आणि समूहगीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षीस, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धकांसाठी प्रवास खर्च, जेवण व नाष्ट्याची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.सर्व स्पर्धकांसाठी
प्रवेश पूर्णतः मोफत असून स्पॉट नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत करता येणार आहे. लोकनृत्य रेकॉर्ड डान्ससाठी लाईव्ह लोकनृत्याची नियमावली बंधनकारक राहील,तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
या युवा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील इच्छुक कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव,रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव,सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांनी केले आहे.
यात्रेकरूंना विविध कला प्रकारांचा आनंद घेता यावा, यासाठी यंदाच्या युवा महोत्सवाचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून
हा महोत्सव निश्चितच युवा कलावंतांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.