साताऱ्यात १६ लाखांची फसवणूक : 📉 १०% परताव्याचं आमिष…‘आर. के. ट्रेडिंग कॅपिटल’चा मालक रोहित काठाळे

साताऱ्यात शेअर मार्केटमधून दरमहा १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ‘आर. के. ट्रेडिंग कॅपिटल’चा मालक रोहित विनोद काठाळे याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुणाल सुभाष पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ साली ते राजवाडा परिसरातील काठाळेच्या कार्यालयात गेले होते. यावेळी आरोपीने फॉरेक्स आणि इंडियन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले होते.या आश्वासनावर विश्वास ठेवून पवार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये ऑनलाईन आणि एनईएफटीद्वारे १६ लाख रुपये गुंतवले. तरीही महिने उलटूनही कोणताही परतावा मिळाला नाही.

परताव्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडून टाळाटाळ सुरू होती. आपण फसवणुकीचा बळी ठरलो असल्याचे लक्षात येताच पवार यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली, मात्र आरोपीने एकही रुपया परत दिला नाही. सप्टेंबर २०२५ पासून आरोपी रोहित काठाळेचा मोबाईल फोन बंद असून तो दिलेल्या पत्त्यावरही राहत नसल्याचे समोर आले आहे.


यानंतर पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून,आपल्यासारख्या अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, २७ सप्टेंबरपासून आरोपीचा मोबाईल बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीकडून नेमकी किती जणांची फसवणूक झाली, याचा सखोल तपास करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *