२२ वर्षांनंतर ऑक्सफर्डची माफी : छत्रपती शिवरायांबाबत चूक मान्य..! साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांची मागितली माफी ….

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि चुकीचे लेखन केल्याप्रकरणी अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने माफी मागितली आहे. तब्बल २२ वर्षांच्या संघर्षानंतर छत्रपती शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांची लेखी माफी मागण्यात आली आहे. अमेरिकी लेखक जेम्स लेन लिखित ‘Shivaji: Hindu King in Islamic India’ या पुस्तकावरून हा वाद पेटला होता.


अमेरिकी लेखक जेम्स लेन याच्या ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या मजकुराविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन झाले होते. अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या प्रकरणात माफी मागत आपली चूक मान्य केली आहे.


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, “या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील काही विधाने पडताळणी न करता प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे जनभावना दुखावल्या गेल्या, याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते. खासदार उदयनराजे भोसले आणि जनतेची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.” हा माफीनामा म्हणजे इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांविरोधात सातारकरांनी दिलेल्या दीर्घ लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे. या निर्णयाचे साताऱ्यातील शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.


“जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ साहेब जिजाऊ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो होतो. सुनावणीदरम्यान प्रकाशन संस्थेने माफी मागण्याची तयारी दर्शवली. अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने लेखी माफी दिली आहे.”


२२ वर्षांनंतर मिळालेला हा न्याय ऐतिहासिक ठरत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी लढणाऱ्यांच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *