
सातारा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या स्थितीत असून, मुंबईत बसून याबाबत चिंता व्यक्त करण्याची गरज नाही, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांना लगावला.
कराड येथे मंगळवारी नगरपालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते.पालकमंत्री देसाई म्हणाले, “आम्ही साताऱ्याच्या जनतेत सातत्याने असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेची नेमकी माहिती आम्हालाच आहे. उगाच मुंबईत बसून सुषमा अंधारे यांनी साताऱ्याबाबत चिंता करू नये.”
🏛️ कराड नगरपालिकेला निधी कमी पडू देणार नाही :-
कराड पालिका निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळत आज आढावा बैठक घेतली असल्याचे देसाईंनी सांगितले.
“कराडकरांनी आमच्या पक्षाच्या राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले. याआधी मंजूर केलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप नगरसेवकांना बैठकीचे निमंत्रण नव्हते, या प्रश्नावर देसाई म्हणाले,“ही केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक होती. त्यामुळे कोणत्याही नगरसेवकांना व्यक्तिगत निमंत्रण दिले गेले नव्हते.”
अंधारे-राऊतांवर टीका : –
एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले,
“अंधारे आणि राऊत हे भाऊ-बहिणीसारखे आहेत. त्यांनी टीका करण्यापेक्षा आपली शिवसेना कितव्या क्रमांकावर आहे हे तपासावे.”
🚫 ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे कुटुंबाचा संबंध नाही :-
सातारा जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना देसाई यांनी स्पष्ट केले की,
“त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही. पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.”