
उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात एक अनोखा उपक्रम पार पडला.खासदार उदयनराजे भोसले यांचे सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश निकम यांनी आपल्या नेत्याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत जनतेचे लक्ष वेधले. उदयनराजेंच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त निकम यांनी रात्री बारा वाजता सातारा शहरातून तब्बल 60 किलोमीटर पायी चालण्याचा संकल्प केला.रात्री बारा वाजताच त्यांनी चालण्यास सुरुवात केली. सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांनी 60 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. त्यानंतर फोन नाक्यावरील शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.उदयनराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी सामाजिक भान राखत वेगळ्या उपक्रमांतून शुभेच्छा देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ऋषिकेश निकम यांच्या या 60 किलोमीटर पायी चालण्याच्या उपक्रमाची सातारा जिल्ह्यातील सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.साताऱ्यात राजकीय वर्तुळात या उपक्रमाची विशेष दखल घेतली जात आहे. वाढदिवस साजरा न करता सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आणि त्याला कार्यकर्त्यांची अनोखी साथ, यामुळे हा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे.