३१ डिसेंबर अलर्ट ⚠️: साताऱ्यात २००० पोलिसांचा बंदोबस्त !मद्यधुंद,हुल्लडबाजी, लाऊडस्पीकर कारवाई….

३१ डिसेंबर अलर्ट नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साह असतानाच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस पूर्णपणे अलर्ट झाले आहेत. हुल्लडबाजी, मद्यधुंद वाहनचालक आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा जिल्ह्यात तब्बल २००० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी विशेष नियोजन आखले आहे. पाचगणी, महाबळेश्वर, वाई, कास, बामणोली, तापोळा, मेढा, कोयनानगर या पर्यटनस्थळांवर विशेष पोलिस पथकांची तैनाती करण्यात येणार आहे. किल्ले, धरणे आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुख्य रस्ते, चेकपोस्ट आणि जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी पॉईंट उभारण्यात येणार आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला ब्रेथ अॅनालायझर मशीन देण्यात आले असून, यासाठी एकूण ३९ विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हॉटेल, लॉजेस आणि ढाबा तपासणी करण्यासाठी दोन-दोन पथके नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचा वॉच ठेवण्यात आला असून, उपविभागनिहाय सात निर्भया पथके कार्यरत राहणार आहेत.

बंदोबस्त माहिती:
या काळात जिल्ह्यात ५ डीवायएसपी, ११ पोलिस निरीक्षक, ७० सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदार, १२०० पोलिस अंमलदार आणि ७०० गृहरक्षक तैनात असतील. स्थानिक गुन्हे शाखेची सात विशेष पथके देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.

ध्वनी प्रदूषण:
मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी जिल्ह्यात ३० ध्वनीमापक पथके कार्यरत राहणार आहेत.

नागरिकांनी नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना नियमांचे पालन करावे, शांतता राखावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *