
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून गेल्या 24 तासात चौथ्यांदा पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 8 फुटांनी उघडून 53 हजार 300 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेर धरणातून 6 हजार 200, उरमोडी 2 हजार 719क्यूसेस, वीर धरण 24 हजार 300,धोम धरणातून 8 हजार 671 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे..पावसाचा जोर वाढला असल्याने कोयना नदीवरील तांबवे, निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले असून संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्याखाली गेला आहे. सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना,कृष्णा, वेण्णा नदीकाठच्या गावांना तसेच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणावरील आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आले आहे.