
९९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या यजमानपदासाठी सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर), महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (इचलकरंजी), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) आणि शाहपुरी शाखा (सातारा) यांनी प्रस्ताव दिले होते. स्थळ निवड समितीने ५ ते ७ जूनदरम्यान सर्व स्थळांना भेटी दिल्यानंतर ८ जून रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत साताऱ्याच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अधिकृत बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला.साताऱ्यात यापूर्वी तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झाले आहे. १९०५ मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे, १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४वे आणि १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६वे संमेलन येथे पार पडले होते. त्यामुळे येणारे संमेलन हे सातायातील चौथे असेल. या आयोजनासाठी गेल्या १२ वर्षांपासून शाहपुरी शाखेच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. या नव्या संमेलनाचे आयोजन साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शाह स्टेडियमवर होणार आहे. हे मैदान १४ एकर क्षेत्रफळाचे असून, २५ हजार प्रेक्षकांची आसनव्यवस्था, दोन उपमंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, भोजन व्यवस्था आणि इतर लहान कार्यक्रमांसाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. शिवाय पाठीमागे असलेल्या पोलिस परेड ग्राउंडच्या आठ एकर जागेचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. हे मैदान शहराच्या मध्यभागी आणि बस स्थानकाच्या जवळ असल्याने साहित्य रसिक व पाहुण्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा होणार आहे. त्यामुळे साताऱ्यातील साहित्यप्रेमींमधे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे