
सातारा : सातारा नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकांना सभेच्या कामकाजामध्ये मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणी सातारा नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक शंकर रामचंद्र माळकुंडे, पंकज चव्हाण, रीना भडंगे, सुनील भंडारी आणि रवी पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार स्वीकृत नगरसेवकांना सभेच्या कामकाजात मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही. मात्र राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार तसेच विधानपरिषदेचे नामनिर्देशित आमदार यांना मतदानाचा अधिकार दिला जातो. त्यामुळे त्याच धर्तीवर स्वीकृत नगरसेवकांनाही समान हक्क देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना समानतेचा अधिकार दिला असताना स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे सातारा नगरपरिषदेच्या येणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव मंजूर करून स्वीकृत नगरसेवकांना सभेत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात असा निर्णय झाल्यास तो देशासाठी एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण निर्णय ठरू शकतो, असे मत स्वीकृत नगरसेवक शंकर माळकुंडे यांनी व्यक्त केले आहे.