पुसेगाव : थरारक अंतिम फेरी | सचिन–लक्षाने पटकावला श्री सेवागिरी हिंदकेसरी किताब |

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शर्यतप्रेमींमुळे पुसेगाव येथे अक्षरशः जनसागर उसळला होता.

उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम फेरीत शाहिदभाई मुलाणी, नातेपुते यांचा ‘सचिन’ आणि श्रीनाथ ज्वेलर्स, आंबेगाव यांचा ‘लक्षा’ या आदत किंग बैलजोडीने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयी बैलगाडीने २ लाख ७८ हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकत ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’चा मानाचा किताब पटकावला. या गाडीचे चालक भैया ड्रायव्हर (भांबवडे) यांना ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी ड्रायव्हर’ या किताबाने गौरविण्यात आले.

पुसेगाव येथील राष्ट्रीय महामार्गालगत बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी ७ वाजता मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते मानाचा नारळ फोडून शर्यतीचा शुभारंभ झाला. यावेळी चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ही तीन राउंडची भव्य बैलगाडी शर्यत असून यंदा तब्बल १००१ बैलगाड्यांची विक्रमी नोंद झाली. गटाचे १११ फेरे आणि १२ सेमीफायनल फेऱ्या पार पडल्या. कमिटीच्या शिस्तबद्ध व उत्कृष्ट नियोजनामुळे एका दिवसातच उजेडात अंतिम फेरी पूर्ण करण्यात आली.

विजेते व मानकरी : द्वितीय क्रमांक – स्व. पंढरीशेठ फडके (विघर, पनवेल) यांचा सर्जा व मनोहर पाटील (छत्रपती संभाजीनगर) यांचा लखन
तृतीय क्रमांक – शौर्य शरदशेठ माने (देवीखिंडी, साखरवाडी) यांचा बावऱ्या व रणवीर राहुलभाई पाटील (आडवली, कल्याण) यांचा मथुर तसेच गोपीनाथशेठ तुंगे (कर्जत), स्व. मनोहरशेठ खाणावकर (कळंबोली), तुषार पैलवान (म्हसुर्णे), दत्तात्रय प्रकाश जगदाळे (कुमठेकर), उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड (चिंचाळे), सांडू मिस्त्री (तळेगाव), सूर्या सम्राट ग्रुप (माळेवाडी) आदी अनेक नामवंत बैलगाडी मालकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

देश–विदेशातून प्रेक्षकांची उपस्थिती देशातील मानाची हिंदकेसरी बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही प्रेक्षक पुसेगावमध्ये दाखल झाले होते. रशियाहून आलेल्या परदेशी पाहुण्यांनीही शर्यतीचा आनंद लुटला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महामार्गाच्या दुतर्फा दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

या एकदिवसीय भव्य आयोजनामुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

शेवटी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम व प्रत्येकी दोन ढाली देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सेमीफायनलमधील मानकरी आणि गट विजेत्यांनाही विशेष सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *