
सह्याद्रीच्या दाट अरण्यात सध्या रंगली आहे प्रेम, वर्चस्व आणि नैसर्गिक निवडीची रोमांचक कहाणी…सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला STR T9 ‘शिलेदार’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या आगमनामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.विशेष म्हणजे हा ‘शिलेदार’ सध्या वाघीण T5 ‘तारा’च्या क्षेत्रात तिच्या मागोमाग फिरताना कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला आहे. पण ताराच्या क्षेत्रात आधीपासूनच T1 ‘सेनापती’ आणि T2 ‘सुभेदार’ हे दोन बलाढ्य नर वावरत आहेत.म्हणजेच आता जंगलात एकच प्रश्न पडला आहे.
तारा कोणाची साथ स्वीकारणार? अनुभवी सेनापती, ताकदवान सुभेदार की नवखा पण धाडसी शिलेदार?
दरम्यान सह्याद्री-कोकण टायगर SKT 21 च्या हालचालीमुळे टायगर कॉरिडॉरची उपयुक्तता पुन्हा अधोरेखित झाली आहे.नव्या वाघाच्या आगमनामुळे सह्याद्रीतील जैवविविधतेला नवे बळ मिळाले असून, जंगलातील ही रोमांचक घडामोड वन्यजीव अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाची ठरत आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि वाघीण कोण कोणाच्या क्षेत्रात?
सध्या जंगलातील ‘प्रेम आणि वर्चस्व’ असे चित्र आहे —
T5 ‘तारा’ – परिपक्व वाघीण, सध्या केंद्रस्थानी
T1 ‘सेनापती’ – बलाढ्य नर, आधीपासून ताराच्या क्षेत्रात
T2 ‘सुभेदार’ – दुसरा प्रभावी नर, त्याच परिसरात
T9 ‘शिलेदार’ – नवा तरुण नर, गेल्या दोन महिन्यांपासून ताराच्या मागेमागे
चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘शिलेदार’ वारंवार दिसून आला आहे. विशेष म्हणजे तो सध्या ताराच्या क्षेत्रात फिरताना आढळतो आहे.सध्या प्रकल्पातील वाघांची यादी :-
T1 – सेनापती T2 – सुभेदार T3 – बाजी T4 – चंदा T5 – तारा T6 – हिरकणी T9 – शिलेदार
क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “नव्या नर वाघाची नोंद सह्याद्रीसाठी आनंदाची बाब आहे. यामुळे येथील जैवविविधता आणि नैसर्गिक प्रजनन प्रक्रिया अधोरेखित होते.”
त्यामुळे तारा वाघीण कोणाची साथ स्वीकारणार, कोणाच्या पिल्लांना जन्म देणार, हे पाहावं लागणार आहे.