
काले (ता.कराड) येथे धक्कादायक घटना समोर आली असून, प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. काले आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संतोष पाटील हे गुरुवारी रात्री काले येथून संजयनगर येथील त्यांच्या घरी मोटारसायकलवरून जात होते. काले–संजयनगर रस्त्यावरील गुंडगेचा माळ शिवारात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. बिबट्या अंगावर येताच संतोष पाटील यांनी प्रसंगावधान राखत मोटारसायकलचा हँडल घट्ट पकडून मान मागे वळवली. त्यामुळे ते थेट हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र, बिबट्याच्या पायांची नखे गळ्याला लागल्याने पाटील जखमी झाले.
जखमी अवस्थेतही धैर्य न सोडता संतोष पाटील सुखरूप घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी तत्काळ मोबाईलद्वारे गावातील युवकांना घटनेची माहिती दिली. काले येथील दवाखान्यात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. बिबट्याचा हल्ला थेट गळ्याच्या दिशेने झाल्याने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वनविभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याशिवाय, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.